पनवेल जवळील सिडको विकसित करीत असलेल्या करंजाडे वसाहतीतील रस्त्यावर जिकडे बघाल तिकडे खड्डेच-खड्डे आहेत. या खड्डयांना वाहनचालक सुद्धा त्रासले आहेत. मात्र या पडलेल्या खड्डयांकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने करंजाडे नोड शिवसेना पक्षाच्या वतीने करंजाडे वसाहतीतील खड्ड्यांमध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला.
गौरव गायकवाड शिवसेना करंजाडे शहर प्रमूख, रामेश्वर आंग्रे सरपंच करंजाडे ग्रामपंचायत, योगेंद्र कैकाडी उपसरपंच करंजाडे ग्रामपंचायत, चंद्रकांत गुजर शिवसेना करंजाडे शहर संघटक, किरण दाते करंजाडे शाखा प्रमुख सौ.सई ताई पवार करंजाडे विभाग प्रमुख, सौ अंजली मानापुरे करंजाडे महिला शहर प्रमुख, सौ प्रतीक्षा लांगी शिवसेना करंजाडे पंचायत समिती महिला उपविभाग प्रमुख, सौ प्रीती मांडेकर करंजाडे महिला उपशहर प्रमुख, सौ मोनिका आवडे करंजाडे महिला सेक्टर 6 शाखाप्रमुख, लिना शहारे करंजाडे महिला सेक्टर 5 शाखाप्रमुख, समीक्षा पाथरे करंजाडे महिला सेक्टर 5 उपशाखाप्रमुख, सौ.हेमा गोतमरे सामाजिक कार्यकर्ते, सौ.उज्वला इसापुरे ज्येष्ठ शिवसैनिक महिला कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सिडकोच्या वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहेत. जिकडेतिकडे खड्डेच खड्डे अशी स्थिती आहे. त्याला करंजाडे वसाहत सुद्धा अपवाद नाही. बहुतांशी सेक्टरमध्ये रस्ते सुस्थितीत नाहीत. त्यामुळे स्थानिक रहिवाशी, वाहन चालक हे गेल्या काही महिन्यापासून त्रस्त आहेत. त्यामुळे अडचणीत आणखीनच भर पडली आहे. एकीकडे सिडको स्मार्ट सिटीच्या गप्पा मारत आहे. आणि दुसरीकडे रस्त्यांची ही अशी स्थिती आहे. त्यातच या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने करंजाडेतील काही ठिकाणच्या रस्त्यांची चाळण झालेली आहे. सिडको या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत आहे. येथील रस्ते दुरुस्तीसाठी सिडकोकडून ठेकेदाराची निवड करण्यात आली आहे. मात्र त्या ठेकेदाराने खड्डे दुरुस्तीसाठी डांबरच नसल्याचे कारण देत आहे. मात्र या डांबराच्या तुटवड्यामुळे एखाद्या वाहनचालकाचा अपघाता झालाच तर सिडको याची जबाबदारी घेणार का? मात्र करंजाडेतील रस्त्यावर जमलेली गर्दी पाहता पण परंतु जरा थांबा.. रस्त्यावर बसलेले नागरिक केक कापत आहे तो साजरा करतात खड्ड्यांचा वाढदिवस. खड्यानी त्रस्त असल्यामुळे करंजाडे येथील गौरव गायकवाड शिवसेना करंजाडे शहर प्रमूख यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी सिडको प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत केक कपात खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा झाल्यानंतर सिडकोच्या अधिकाऱयांना लवकरात लवकर खड्डे दुरुस्ती करा अन्यथा सिडको कार्यालयावर आंदोलन मोर्चा घेऊन येऊ असा इशारा शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी उपसरपंच योगेंद्र कैकाडी, चंद्रकांत गुजर, सई पवार, यांनीही मनोगते व्यक्त करीत सिडकोचा निषेध केला.
कोट-
शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल..
करंजाडेतील खड्डे दुरुस्तीबाबत सिडको जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यावेळी सिडकोचा निषेध म्हणून आज येथील खड्ड्यांचाच वाढदिवस साजरा केला. त्याचबरोबर सिडकोला अल्टिमेट दिला आहे. जर लवकरात लवकर खड्डे दुरुस्ती झाले नाही तर सिडको कार्यालयावर शिवसेना स्टाईलने मोर्चाचे आंनदोलन केले जाईल.
– गौरव गायकवाड – शिवसेना करंजाडे शहर प्रमूख
खड्डे दुरुस्तीबाबत वारंवार पाठपुरावा..
करंजाडेतील खड्डे दुरुस्ती करण्याबाबत सिडको अधिकाऱयांना यापूर्वीच पत्रे दिले आहेत. त्याचबरोबर अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून खड्डे दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरु आहे. त्याचबरोबर आजच्या खड्ड्यांचा साजरा केलेल्या वाढदिवसामुळे सिडको नक्कीच दखल घेऊन खड्डे दुरुस्तीतीला प्रामुख्याने वेग घेऊन कामे सुरु करेल.
– रामेश्वर आंग्रे – सरपंच करंजाडे ग्रामपंचायत
फोटोः शिवसेनेने करंजाडे येथे खड्ड्यात केला वाढदिवस साजरा
एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
पनवेल दि.10 (वार्ताहर)- सीबीडी परिसरातील चोरट्यांनी एटीएमला लक्ष्य केले असून, एटीएमची देखभाल दुरुस्ती करण्याऱ्या कंपनीचे एक्झीक्युटीव यांना पाहणी दरम्यान एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती सीबीडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीबीडी परिसरातील धाकटा खांदा पनवेल येथील राहणारे महेश पाटील हे हिताची पेमेंट सर्व्हिस प्रा.लिमिटेड या कंपनीमध्ये एक्झीक्युटीव म्हणून काम करीत आहेत. यावेळी पाटील हे या कंपनीच्या मार्फत आयसीआयसी बँक, एक्सीस बँक, एस बँकयांच्यासह इतर बँकेच्या एटीएमच्या दुरुस्ती व देखभालीची कामे करीत आहे. यावेळी सीबीडी परिसरातील एटीएमची पाहणी करीत असताना आढळले कि बेलापूर येथील एक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला यावेळी मशीनचा स्क्रीन व मशीनच्या दरवाजा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर मशीन फोडण्यासाठी दगड व लोखंडी वस्तू वापरण्यात आली असल्याचे समोर आले आहे. यावेळी हि तक्रार सीबीडी पोलीस ठाण्यात केली असून पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु केला आहे.
दोन बालकामगारांची करण्यात आली सुटका
पनवेल दि.10 (वार्ताहर)- नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कळंबोली परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून दोन बाल कामगारांची सुटका केली. तसेच या बाल कामगारांना कमी वेतनात अतिश्रमाचे काम देऊन राबवून घेणाऱ्या एका आस्थापना चालकातील दोंघावर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.
कळंबोली पोलीस मुख्यालयाच्या समोरील एका स्वीट्सच्या दुकानांमध्ये दोन बालकामगारांना कामावर ठेवण्यात आल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग सोनावणे यांना मिळाली होती. त्यानुसार सोनावणे यांनी आपल्या पथकासह या आस्थापनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील त्यांच्या पथकाने कळंबोली येथील स्वीट्सच्या दुकानात छापे मारले. यावेळी दोन बालकामगारांची सुटका करण्यात आली. हसमुख भिमजी पटेल राहणार डि स्प्रिंग सोसा, रोडपाली कळंबोली, लोकेश लिंगे गौंडा राहणार गणेशधाम सोसा से-21 कामोठे यांच्यावर कळंबोली पोलीस ठाण्यात बालकामगार, प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम व अल्पवयीन न्याय, मुलांची काळजी व संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या वतीने देण्यात आले लसिकरणाचे 90 डोस
पनवेल दि.10 (वार्ताहर)- तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या वतीने सातत्याने लसिकरणाचे डोस वाटप शासनाच्या माध्यमातून सुरू असून आजही कोव्हिशिल्डचा पहिला डोस आणि दुसरा असे ९० डोस देण्यात आले.
त्यावेळेस ग्रामपंचायत पारगाव सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक, उपसरपंच सौ. अंजली राहूल कांबळे, माजी उपसरपंच मनोज दळवी, माजी उपसरपंच रत्नदीप पाटील, माजी उपसरपंच सुशील कांत तारेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ निशा रत्नदीप पाटील, सौ बानुबाई बाबुराव म्हात्रे, ग्राम विकास अधिकारी मोरेश्वर मोकल, डॉक्टर भारती ग्रामपंचायत ऑपरेटर सौ सोनाली देशमुख, प्रमोद म्हात्रे, चंद्रभागा तारेकर, देवले हे उपस्थित होते.
फोटोः ग्रुप ग्रामपंचायत पारगाव येथे संपन्न झालेली लसीकरण मोहिम
इसम बेपत्ता
पनवेल दि.10 (संजय कदम)- राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम कोठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
गोपाळ सदाशिव महाले (वय-32) रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, डोक्याचे केस काळे वाढलेले, डोळे काळे, उंची 5 फूट असून अंगाने मजबूत आहे. तसेच अंगात राखाडी रंगाची फूल पॅंट व राखाडी रंगाचा चौकटीचा फूल बाह्यांचा शर्ट घातलेला आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-27452333 किंवा पो.ना. अतुल देवकर यांच्याशी संपर्क साधावा.
फोटोः बेपत्ता गोपाळ महाले
1 लाख 74 हजारांची ऑनलाईन केली फसवणूक
पनवेल दि.10 (संजय कदम)- 1 लाख 74 हजारांची ऑनलाईन फसवणूक एका वृद्ध इसमाची झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
गौतम घटक (वय-60, रा.-तक्का) असे या इसमाचे नाव असून त्यांना एका अज्ञात इसमाने फोन करून तो एक्सिस बॅंक क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या क्रेडिट कार्डवर रिवार्ड पॉईंट्स जमा झाली असून ते तुम्ही रिडीम करून घ्या असे खोटे सांगून त्यांच्या क्रेडिट कार्ड क्रमांकाची सर्व माहिती घेऊन त्यानंतर त्याने बॅंकेच्या खोट्या साईटवर जाण्यास सांगून त्यांच्या सर्व माहितीच्या आधारे त्यांच्या क्रेडिटकार्ड वरून त्यांच्या संमतीशिवाय कोणत्यातरी अनोळखी खात्यावर एकूण 1,74,397 रू. ट्रान्सफर करून त्यांची ऑनलाईन फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
गॅस सिलेंडरच्या स्फोटात झोपडी पेटली
पनवेल दि.10 (वार्ताहर)- एका झोपडीत गॅस सिलेंडर स्फोट झाल्याने ती झोपडी पेटल्याची घटना पनवेल जवळील करंजाडे फाटा येथे घडली असून सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही आहे.
येथील से.-2 परिसरात असलेल्या रस्त्यावरील एका कोपऱ्यात झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीत मध्यरात्रीच्या सुमारास एका झोपडीत गॅस सिलेंडर स्फोट होऊन अचानकपणे आग लागली. या आगीची माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच तातडीने अग्निशमन दलाला व पनवेल शहर पोलिसांना कळविण्यात आले व ती पथकेसुद्धा त्वरीत घटनास्थळी पोचून आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे.