गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता
नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे महापौर – महापालिका आयुक्तांचे आवाहन
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळसदृश्य (गुलाब चक्रीवादळ) स्थिती निर्माण होत असून दिनांक २७ सप्टेंबर २०२१ ते दि १ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने या कालावधीत नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापौर डॉ.कविता किशोर चौतमल व महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
दिनांक २७ सप्टेंबर २०२१ ते दि १ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत कोकण किनाऱ्यावर ४०-४५ ते ६० किमी. प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे व या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. सदर कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व मच्छीमार व समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्यावतीने नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. यामध्ये झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापौर डॉ. कविता किशोर चौतमल आणि महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
दरम्यान पनवेल महापालिकेच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री क्र. 1800227701 व हेल्पलाईन क्र. 02227461500 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहनही महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.