पनवेल(प्रतिनिधी) आज मी शिट्टी वाजवून आमदार झालो असलो तरी पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाडून भारतीय जनता पक्षाचा आमदार असणार आहे. येत्या तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासाची गंगा आणणार आहे, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी रविवारी चौक येथे दिले.
उरण विधानसभा मतदारसंघातील चौक जिल्हा परिषद विभागात महेश बालदी यांच्या आमदार निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले तसेच यानिमित्ताने कार्यकर्ता मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होेते. तुम्ही दिलेले मतदान मी कधीच विसरणार नाही, असे सांगून शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
या कार्यक्रमास भाजप नेते माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा चिटणीस विनोद साबळे, तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, अॅड. राजेंद्र येरूणकर, माजी सभापती दामू खैर, दर्शन पोळेकर, गणेश कदम यांच्यासह आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दसरा साजरा झाल्यानंतर मी स्वतः सर्व आदिवासी वाड्यांमध्ये फिरून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांना दिलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचवून भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक वाढविण्याचे काम करणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केले.
या वेळी उरण गोवठणे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या, खालापुरातील बोरगाव येथील शेकाप व शिवसेनेच्या, माडपमधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या, खरसुंडी येथील राष्ट्रवादीच्या, वावंढळ येथील शेकाप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे आमदार महेश बालदी आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पक्षात न्याय मिळेल, असे आमदार बालदी यांनी सांगितले.