भरतनाट्यममध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पनवेलची मान अभिमानाने उंचविणाऱ्या नृत्यआरा धना कला निकेतन संस्थेच्या संचालिका व प्रशिक्षक दिपीका सराफ यांना अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने ‘स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात झालेल्या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर, मिसेस इंडिया इंटरनॅशनल संगित खैरनार यांच्या हस्ते दिपीका सराफ यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नृत्य आराधना कलानिकेतन संस्था गेल्या दहा वर्षांपासून पनवेलमध्ये नृत्यांचे धडे विद्यार्थ्यांना देत आहे. अल्पावधीतच या संस्थेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी प्रशिक्षित झाले असून या संस्थेतील विद्यार्थी सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत. देशात आणि परदेशात झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णयश संपादन करत पनवेलसह रायगडचे नाव अधिक उज्ज्वल केले आहे. या विद्यार्थ्यांना दिपीका सराफ यांचे प्रशिक्षक म्हणून मौल्यवान मार्गदर्शन लाभत असते. त्यांच्या या उत्तम कामगिरीबद्दल अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
