साऊथ एशियन फेडरेशन ऑफ ऑल स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ ओपन इंटरनॅशनल गेम्स २०२१’ बॅडमिंटन स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाचा विद्यार्थी मिहीर मदन परदेशी या ने बॅडमिंटन पुरुष खुल्या एकेरी गटातील स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून सुवर्ण कामगिरी केली. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मिहीरचा सत्कार करण्यात आला.
नेपाळ येथील शान बँक्वेटमध्ये बॅडमिंटन आशिया स्पर्धेत २० वर्षीय मिहीर परदेशीने सरस कामगिरी करत सुवर्ण पदक पटकाविले. मिहीर चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचा टीवाय बीकॉमचा विद्यार्थी आहे. शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात त्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. या कामगिरीबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत ब-हाटे, उपप्राचार्य एस. के. पाटील, क्रीडा शिक्षक विनोद नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी मिहीरचे अभिनंदन केले.