रक्षाबंधनच्या दिवशी मिळाली अनोखी भेट
पनवेल दि. 4(प्रतिनिधी)
दारुच्या व्यसनाधिन झालेला तरुण 1 वर्षे 7 महिन्यापूर्वी आशा की किरण या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला होता. व्यसनमुक्ती केंद्राची फी देवू शकत नसल्यामुळे बहिणीला भावाशिवाय1 वर्षे 7 महिने लांब रहावे लागले. मात्र आशा कि किरण व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष बशीर कुरेशी व त्यांची पत्नी नूरजहाँ कुरेशी यांनी भावाला व्यसनमुक्त करुन घरी पाठवून रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीला अनमोल भेट दिली. एवढच नव्हे तर कुरेशी कुटंबियांनी 1 लाख 70 हजार रुपयांचे बिलही माफ केल्याने बहिणीच्या चेहर्यावर आनंदाश्रू वाहत होते.
दारुच्या व्यसनाधीन झालेला राकेश या तरुणाला तो व्यसनमुक्त व्हावा म्हणून त्याच्या बहिणीने त्याला आशा की किरण या व्यसनमुक्ती केंद्रात उपचारार्थ दाखल केले होते. या व्यसनमुक्ती केंद्रात जेवण, राहणे व औषधोपचार याच्या खर्चाची कल्पना बहिणीला माहिती होती. मात्र काही आर्थिक अडचणींमुळे 1 वर्षे 7 महिन्यांपासून या व्यसनमुक्ती केंद्राचे बिल अदा न करु शकल्याने राकेश हा व्यसनमुक्त होवूनसुध्दा त्याची मुक्तता होत नव्हती. अखेर बहिणीने ही समस्या अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र अण्णा पंडीत, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांच्याकडे मांडली असता या तिघांनी बहिणीला सोबत घेवून आशा की किरण व्यसनमुक्ती केंद्र गाठले. यावेळी आशा की किरण व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष बशीर कुरेशी व त्यांची पत्नी नूरजहाँ कुरेशी यांना बहिणीच्या आर्थिक अडचणीची कल्पना देवून राकेश याला या केंद्रातून घरी पाठविण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत कुरेशी कुटूंबियांनीही 1 लाख 70 हजार रुपयांचे बिल माफ करुन रक्षाबंधनच्या दिवशीच भावाला बहिणीच्या स्वाधीन करुन रक्षाबंधनची भेटच दिली.
आशा की किरण व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष बशीर कुरेशी यांच्या पत्नी नूरजहाँ कुरेशी या स्वतः उच्चशिक्षित असून त्यांनी एमएसडब्ल्यू ही पदवी प्राप्त केली आहे. शासनाच्या नियमांप्रमाणे या व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनाधिनांचे उपचार केेले जातात. सुमारे 100 हून अधिक व्यसनाधीन या ठिकाणी उपचार घेत आहेत. ज्यांचे मानसिक संतुलन योग्य करण्यासाठी त्यांना समुपदेशन करण्यात येते. त्याचप्रमाणे योगा, सकारात्मक जीवन जगण्याची पध्दती शिकवण्यात येते. नूरजहाँदिदी व्यक्तिशः या सगळया व्यसनाधीनांना समुपदेशन करत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत असतात. या व्यतिरिक्त बशीर कुरेशी हे ही सामाजिक कार्यात अग्रेसर असून लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्यांनी केले. यावेळी अन्याय, अत्याचार निर्मुलन समिती कोकण प्रदेश संघटक संतोष चाळके, आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेश अध्यक्षा किशोरी पाटील, सामाजिक कार्यकर्ते राहूल बोर्डे आदी उपस्थित होते.
राकेश याच्या बहिणीने आशा की किरण व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष बशीर कुरेश, सचिव नूरजहाँ दिदी कुरेशी, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र अण्णा पंडीत, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांचे विशेष आभार मानले.
