अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र सरकारने मोटर वाहन सुधारणा अधिनियम-2019 ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याने वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनचालकांच्या खिशाला आता चांगलीच चाट पडणार आहे. सुधारित नियमानुसार ई-चलान प्रणालीमध्ये दंडाच्या रकमेबाबत 11 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्रीपासून बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलल्यास 200 रुपयांऐवजी तब्बल एक हजार रुपयांचा दंड भरण्याची तयारी वाहनचालकांना ठेवावी लागणार आहे.
राज्य सरकारने अलीकडेच यासंदर्भात परिपत्रक काढीत मोटर वाहन कायदा-2019 च्या तरतुदी राज्यात लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. 1 डिसेंबरपासून हा नवीन अधिनियम लागू करण्याचे आदेश होते. परंतु वाहतूक पोलिसांच्या दंडवसुलीच्या ई – चलान प्रणालीमध्ये प्रत्यक्षात 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नवे बदल अमलात येणार आहेत. त्यामुळे वाहने शिस्तीने चालवावी लागणार असून नियम मोडल्यास 100 पट दंड भरण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. मोटर वाहन कायदा मोडल्याने होणाऱया दंडाच्या रकमेत वाढ केल्यामुळे रस्ते अपघात कमी होण्यास मदत होईल. तसेच वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात जागरूकता येऊन नागरिकांना शिस्त लागेल असे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी यासंदर्भात म्हटले आहे.