दि युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे येथे झालेल्या खो – खो क्रीडा राष्ट्रीय निवड चाचणीमध्ये १४ वर्ष वयोगटाच्या  महाराष्ट्र राज्य संघातून उत्तराखंड येथे होणाऱ्या खो-खो स्पर्धेसाठी नवी मुंबई महानगरपालिका  राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या आशिष गौतम या इयत्ता सहावीत शिकणा-या मुलाची बालदिनाच्या दिवशी निवड झालेली होती. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून निवड झालेला आशिष हा एकमेव खेळाडू होता.

      हिमाचल प्रदेश येथे झालेल्या सदर राष्ट्रीय स्पर्धेत आज महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने एक डाव राखून दणदणीत विजेतेपद पटकाविले. त्यात विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आशिष गौतम यांस अत्युत्कृष्ट खेळाबद्दल खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने भरत पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्याचे हे देश पातळीवरील यश नवी मुंबईकरांची मान उंचाविणारे आहे.

      आशिषच्या शैक्षणिक, क्रीडा वाटचालीत माजी महापौर सुधाकर सोनवणे यांचा वरदहस्त कायम पाठीशी राहिला आहे. त्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्याचे अंगभूत क्रीडा कौशल्य लक्षात घेऊन त्याला आवश्यक सुविधा पुरविण्यामध्ये सुधाकर सोनवणे यांनी विशेष लक्ष दिले.

      विहंग स्पोर्ट्स क्लबचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक मनोज पवार तसेच श्री रवी परामणे, कानिफ बांगर यांनी त्याच्या खेळाकडे विशेष लक्ष दिले आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे आशिष राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या भरत पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. आपल्या आईचे निधन झाल्यानंतर दुस-याच दिवशी खेळाच्या सरावासाठी मैदानात उतरणारा आशिष गौतम ख-या अर्थाने भरत पुरस्काराचा सक्षम मानकरी आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.