श्री दत्तांचे भक्त प्रभुदास भोईर यांच्या निवासस्थानी दत्त जयंती उत्सव जल्लोषात साजरा

। पनवेल । प्रतिनिधी
खिडुकपाडा येथील प्रभुदास भोईर यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे उत्सवाचे 19 वर्ष असून हरीकिर्तन, हरिपाठ भजन, होम हवन, महाप्रसाद, श्रींचा अभिषेक अशा धार्मिक सोहळ्यांसह जत्रेचा माहोल आणि त्यावर मनोरंजनाचा खास तडका अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


प्रभुदास भोईर हे शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत.
यंदाच्या दत्त जयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती!
यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले की प्रभुदास भोईर गेली पाच वर्षे या सोहळ्यासाठी आमंत्रित करत आहेत.
परंतु येथे येऊन श्री दत्तदर्शन घेण्याचा योग यावर्षी आला.
प्रभुदास भोईर या सोहळ्याच्या निमित्ताने फार मोठे सामाजिक प्रबोधनाचे कार्य उभारत आहेत. अत्यंत संतुलित पद्धतीने ते हे सामाजिक प्रबोधनाचे कार्य उभारत असतात, येथे येणार्‍यांचा अत्यंत अदबीने पाहुणचार करत असतात. आणि म्हणूनच या तालुक्यातील एक ब्रँड म्हणून या सोहळ्याची ओळख निर्माण झाली आहे. मी प्रभुदास भोईर यांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे वर्षानुवर्षे त्यांच्या या कार्यक्रमाची उंची वाढती राहो अशा सदिच्छा व्यक्त करतो.असे ते म्हणाले.

आमदार जयंत पाटील यांनी यावेळी मनोभावे श्री दत्त दर्शन घेतले त्यावेळी त्यांच्या समवेत बाळासाहेब यांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदाम गोकुळ शेठ पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश चंद्रकांत कडू, तालुका चिटणीस राजेश केणी, माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, बाजार समितीचे माजी सभापती मोहन कडू, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
दत्त जयंती उत्सवाची सुरुवात मंगळवार दिनांक 6 डिसेंबरपासून झाली. कीर्तनकार अश्‍विनी म्हात्रे यांच्या हरिकीर्तनाने दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ झाला.
भल्या पहाटे श्रींच्या अभिषेकाने धार्मिक विधींना प्रारंभ करण्यात आला त्यानंतर होम हवन व श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. हजारो भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सकाळच्या सत्रामध्ये खिडूकपाड्याचे कुमारिका भजन मंडळ आणि खारघर चे हनुमान भजन मंडळ यांच्या वतीने भजन सेवा देण्यात आली. तर सायंकाळच्या सत्रामध्ये खिडूकपाडा येथील श्री लक्ष्मीनारायण हरिपाठ मंडळ आणि लक्ष्मीनारायण भजन मंडळ यांच्या सुश्राव्य भजनाचा आस्वाद हजारो भाविकांनी घेतला.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.