पनवेल महानगरपालिकेचे देशांमधील पहिल्या तीन स्वच्छ शहरांमध्ये क्रमांक यावा यासाठी पालिका क्षेत्रातील स्वच्छतेवर भर द्यावा. पुढील वर्षी सर्वेक्षणामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी सर्व प्रभाग अधिकारी, सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक, सर्व आरोग्य निरीक्षक, स्वच्छता पर्यवेक्षक, मुकादम, कंत्राटदारांनी, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कटाक्षाने काम करावे, अशा सूचना आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी केल्या.
मा.आयुक्तांच्या उपस्थितीत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानासंदर्भातील पाहिली बैठक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकतीच झाली. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल सर्वांचे आयुक्तांनी अभिनंदन केले.
नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय वापरण्यायोग्य ठेवणे, स्वच्छता व दुरुस्तीवर लक्ष देणे. शहरांमध्ये कचऱ्याचे ढीग साठणार नाहीत याची खबरदारी घेणे. बाजारपेठां व कमर्शियल क्षेत्रात साठणारा कचरा दिवस आणि रात्र अशा दोन सत्रांमध्ये उचलण्याचे नियोजन अधिकारी व कर्मचा-यांनी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
संपूर्ण शाश्वत विकासासाठी नागरिकांशी सुसंवाद साधून काम करण्याबाबतचे निर्देश आयुक्तांनी दिले. उपस्थित अधिकारी ,कर्मचारी यांना उपायुक्त सचिन पवार यांनी सखोल मार्गदर्शन केले.
या बैठकीस उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, विभागप्रमुख अनिल कोकरे, कक्ष प्रमुख मधुप्रिया आवटे यांची उपस्थिती होते.