लखानी बिल्डरच्या खोपोली येथील ‘ऑर्चिड वूड’ ऑफिसच्या समोर आमरण साखळी उपोषण
खोपोली (जि. रायगड) / प्रतिनिधी :- बांधकाम व्यावसायिक लखानी बिल्डर व त्याच्या मॅनेजर यांनी केलेल्या फसवणुकीविरोधात नडोदे (ता. खालापूर) येथील रामदास भगवंत सुर्वे व कामोठे (ता. पनवेल) येथील प्रविण रमेश संकपाळ यांनी दि. 14 एप्रिल 2022 पासून लखानी बिल्डरच्या खोपोली येथील ‘ऑर्चिड वूड’ ऑफिसच्या समोरील भागातच आमरण साखळी उपोषण सुरू केले आहे.
याबाबत फिरोज पिंजारी संपादक यांच्या शी बोलताना रामदास भगवंत सुर्वे म्हणाले की, सन २०१५ च्या सुमारास खोपोली फाटा या ठिकाणी मुंबईतील लखानी बिल्डर यांनी ‘लखानी ऑर्चिड वूड’ या नावाने मोठी इमारत बांधकाम करण्यास घेतली. विविध सुविधा असल्याचे दाखवून स्थानिक लोकांना आकर्षण दाखविण्याकरीता जाहीरात सुरुवात केली. सदर इमारतीमध्ये आपले ही घर असावे या करीता मी व माझा मुलगा याने लखानी बिल्डर याचेकडे दोन सदनिका एकत्र करून घेण्याकरिता सन २०१५ ते २०१९ कालावधीत चेकद्वारे ८ लाख ८० हजार व टप्प्याटप्यात रोख रक्कम १६ लाख १० हजार अशी एकूण २४ लाख ९० हजार अशी स्वतः खोपोली येथील त्यांच्या साईट ऑफीसमध्ये जाऊन मॅनेजर करवी जमा केली.
परंतु या दरम्यान बिल्डरने नेमलेल्या मॅनेजर प्रताप तुकाराम चव्हाण व सुंदर लखानी यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला व याबाबत लखानी बिल्डर याकडे जाब विचारला असता विजय लखानी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. याबाबत फौजदारी गुन्हा ही दाखल केला आहे. परंतु सदर गुन्हयाचा तपास ही कासवाच्या गतीने सुरू असल्याचे दिसून येते. माझ्यासह परिसरातील इतर नागरीक ही आहेत की ज्यांची मोठी फसवणूक या बिल्डर व मॅनेजरने केलेली असल्याचा आरोप सुर्वे यांनी लावला आहे.
ते पुढे म्हणाले की, याकरिता मी आता ठरविले आहे की, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत सदर बिल्डरच्या खोपोली येथील ‘ऑर्चिड वूड’ ऑफिसच्या समोरील भागातच आमरण साखळी उपोषणाकरिता आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व ज्यांनी कायदा दिला अशा महामानवाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी दि. १४ एप्रिल २०२२ पासून बसलो आहे व यामध्ये फसवणूक झालेले इतर नागरीक ही सहभागी होवू शकतात, असे त्यांनी सांगितले.
- कामोठे प्रविण संकपाळ यांचेही आंदोलन :- कामोठे (ता. पनवेल) येथील प्रविण रमेश संकपाळ म्हणाले की, या इमारतीचे भूमीपुजन माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते मोठया थाटामाटात करण्यात आले होते. एवढचा मोठया इमारतीमध्ये स्वप्नातील घर घेण्याकरिता खुप सा-या स्थानिक लोकांनी सुरूवात केली. त्यात काही लोकांनी आपल्या पोटाला चिमटा काढून, आपली शेती विकून, काहींनी सोने विकून तर काहींनी आपल्याच व्यवसायातील रक्कम या ठिकाणी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली.
लखानी बिल्डरने या ठिकाणी सर्व जबाबदारी ही साईड हेड मॅनेजर प्रताप तुकाराम चव्हाण यांच्यावर दिली व तो बिल्डर सुंदर लखानी यास माहिती देईल या पध्दतीने सदनिका विक्रीस सुरूवात केली. यामध्ये मी ही माझे व्यवसायातील पैसे टप्प्याटप्प्याने (प्रथम चेक व नंतर रोख रक्कम या स्वरूपात) गुंतवण्यास सुरूवात केली. दस्त नोंदविण्या इतपत पैसे पुर्ण झाल्यानंतर ही कोणतेही दस्त नोंदवून दिलेले नाही.
सन २०१५ ते २०१८ या चार वर्षाच्या कालावधीनंतर ज्यावेळी प्रताप चव्हाण व सुंदर लखानी यांनी मोठया प्रमाणात सदनिका करिता येणारा रोख रक्कमेच्या पैशाचा अपहार केला व इमारतींचे बांधकामामध्ये प्रगती दिसून आली नाही. त्यावेळी हळूहळू नागरीकांना कळाले की, यामध्ये आपली फसवणूक होत आहे हे दिसून आले. याबाबत बिल्डर याच्या सतरा प्लाझा, वाशी येथील मी तसेच इतर नागरीकांनी ही बिल्डर विजय लखानी यांच्याकडे तक्रारी केल्या परंतु त्यांनीही मॅनेजर प्रताप चव्हाण व सुंदर लखानी यांना पाठीशी घालण्याचे काम केले.वास्तविक पाहता, बिल्डरने सन २०१९ ते २० या वर्षांत काही इमारतींचे काम करून घरे ताब्यात देणे बंधनकारक होते. मात्र यामध्ये ही बिल्डरने सुरुवातीस अनेक नागरीकांना सन २०१९ मध्ये घर देतो असे सांगून प्रत्यक्षात खरेदीखतामध्ये सन २०२२ असा उल्लेख केलेला आहे. यात ही लोकांची फसवणूक केली आहे व खुप मोठया प्रमाणात आर्थिक घोटाळा यांनी केलेला आहे.यावेळी मी स्वतः मॅनेजर व बिल्डर यांचे विरोधात आर्थिक गुन्हे शाखा, अलिबाग यांच्याकडे गुन्हा नोंदविला आहे. परंतु गुन्हयाचा तपास ही कासवाच्या गतीने सुरू असल्याचे जाणवते. याकरिता मी आता ठरविले आहे की, कायद्याने मला दिलेल्या अधिकाराचा वापर करून मी माझे हक्क व न्याय मिळवून घेणार, या उपर जावून ही जर मला न्याय मिळाला नाही तर, संतशिरोमणी, जगद्गुरू वैकुंठवासी तुकोबाराय यांनी सांगितले आहे की, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी !!