पत्रकारांच्या मागण्या शासनापर्यंत पोहचविणार – तहसीलदार
* आंदोलनाला पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांची भेट
* आम आदमी पार्टीचा पत्रकारांना जाहीर पाठिंबा
* अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे ठिय्या आंदोलन
* पत्रकारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पत्रकार विकास महामंडळाची स्थापना करा!
* अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF) ची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
खोपोली (जि. रायगड) / अनिल पवार (राष्ट्रीय संपादक) :– पत्रकारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पत्रकार विकास महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी करीत अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनच्या (एबीजेएफ) वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून पत्रकारांकडून करण्यात येत असलेल्या मागण्या शासनापर्यंत पोहचविणार, असे आश्वासन खालापूर तहसीलदार अय्युब तांबोळी यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
खालापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी देखील आंदोलनस्थळी भेट देत पत्रकारांच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, आम आदमी पार्टीचे प्रभारी डॉ. रियाज पठाण, खोपोली शहर उपाध्यक्ष शिवा शिवचरण आदींनी आंदोलनाला भेट देत पाठींबा दिला.
पत्रकारांची आर्थिक स्थिती चांगली नसून त्यांना बँकांकडून कर्ज घेताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळे पत्रकारांचे जीवन सुधारण्यासाठी केंद्र सरकारने पत्रकार विकास महामंडळाची स्थापना करावी आणि त्या महामंडळामार्फत ‘मुद्रा लोन’ प्रमाणे या महामंडळाने पत्रकारांना व्यवसायासाठी ५० हजार ते १० लाखांचे कर्ज द्यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासोबतच पत्रकारांसाठी स्वतंत्र हेल्थ कार्ड, पत्रकारांसाठी टोलमाफी आणि डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी अॅक्रिडेशन कार्ड अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF) कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जारी करण्यात यावे. पत्रकारांच्या मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनच्या वतीने 1 मे 2022 रोजी देशातील प्रत्येक तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, महाराष्ट्र राज्य महासचिव खलील सुर्वे, कोकण प्रदेश अध्यक्ष नरेश जाधव, कोकण प्रदेश सचिव सुधीर माने हे सहभागी झाले असून अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन नेरळ शहर अध्यक्ष तथा विस्टा न्यूजचे संदेश साळुंखे, पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली (भारत) कोकण प्रदेश उपाध्यक्ष दशरथ मुणे, दै. नवशक्ती वृत्त संपादक गणेश मते, दै. सकाळचे मनोज कळमकर आदींनी आंदोलनाला भेट दिली.
-: पत्रकारांसाठी करण्यात येत असलेल्या मागण्या :-
* डिजिटल मिडीयाला रितसर, कायदेशीर परवानगी देण्यात यावी. वेब व व्हिडिओ पोर्टलला माहिती व प्रसारण मंत्रालयाने रितसर रजिस्ट्रेशन द्यावे.
* डिजिटल मिडीयाला देखील शासकीय जाहिराती देण्यात याव्यात. व्हिडिओ चँनेल व पोर्टलला व्हिडीओ तर वेब पोर्टलला प्रिंटप्रमाणे जाहिराती देण्यात याव्यात.
* डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांना अँक्रीडेशन कार्ड देण्यात यावेत. रेल्वे, बससह विविध शासकिय योजनांमध्ये डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांना सवलत देण्यात यावी.
* पत्रकारांसाठी केंद्रस्तरावर राष्ट्रीय पत्रकार कल्याण महामंडळ स्थापन करून, त्यांना ‘मुद्रा लोन’च्या पार्श्वभूमीवर कर्ज देण्यात यावे.
* देशभरातील पत्रकारांसाठी संरक्षण कायदा लागू करून त्याची योग्य ती अमंलबजावणी करण्यात यावी. पत्रकारांवर हमले करणारे किंवा धमकी देणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी.
* देशातील सर्वच जेष्ठ पत्रकारांना समान पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
* बातमीदारीसाठी जाणाऱ्या पत्रकारांना सरसकट टोलमाफी देण्यात यावी.
* शासकीय यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना सुध्दा शासकीय जाहिराती देण्यात याव्यात.
* पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
* पत्रकारांसाठी आवास योजनेतून घरे बनविण्यात यावीत.
* आयुष्यमान आरोग्य योजनेच्या धर्तीवर पत्रकारांसाठी स्वतंत्र आरोग्य कार्ड देण्यात यावे, तसेच पत्रकारांना उपचारासाठी सवलत देण्यात यावी.
* देशातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी करण्यात यावी, त्यांचा डाटा कलेक्ट करावा जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ देण्यास सोईस्कर होईल.
अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या रास्त असून त्या मागण्या शासनापर्यंत नक्कीच पोहचविणार.
– श्री. अय्युब तांबोळी
तहसीलदार
खालापुर तालुका.
पत्रकारांच्या मागण्या योग्य पण पत्रकारांना देखील शैक्षणिक पात्रता असायला हवी. अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनच्या मागण्या शासनापर्यंत पोहचविणार.
– श्री. अनिल विभूते
पोलिस निरीक्षक
खालापूर पोलीस स्टेशन.
आज ‘एबीजेएफ’कडून करण्यात येत असलेल्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचा जाहीर पाठींबा आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना देखील शासकीय योजनांचा लाभ मिळावा.
– डॉ. रियाज पठाण
शहर प्रभारी
खोपोली आम आदमी पार्टी.
पत्रकारांचे जीवन सुधारण्यासाठी केंद्र सरकारने पत्रकार विकास महामंडळाची स्थापना करावी आणि त्या महामंडळामार्फत ‘मुद्रा लोन’ प्रमाणे या महामंडळाने पत्रकारांना व्यवसायासाठी ५० हजार ते १० लाखांचे कर्ज द्यावे. अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनच्या आंदोलनाला पाठींबा आहे.
– श्री. अल्ताफ मंसुरी
शिवसेना वाहतूक आघाडी
महाराष्ट्र राज्य प्रदेश उपसचिव.
खालापुर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु पत्रकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास 1 जुलैपासून देशभरात आंदोलन करण्यात येईल.
– श्री. खलील सुर्वे
महाराष्ट्र राज्य महासचिव
अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन.