सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पनवेलमध्ये दिवाळीची पहाट सजली; हजारो रसिकांनी घेतला संगीत फराळाचा आस्वाद 

पनवेल/ 

दीपावलीची पहाट, त्यातच थंडीचा गारवा आणि त्यामध्ये सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पनवेलमध्ये दिवाळीची पहाट सजली होती. निमित्त होते ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवार, दि.  २३ ऑक्टोबर) पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे संपन्न झालेल्या ‘दिवाळी पहाट’चे.
              यंदा दिवाळी पहाटचे सहावे वर्ष होते. यामध्ये झी मराठी लिटिल चॅम्प फेम प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शमिका भिडे, तसेच सूर नवा ध्यास नवा स्पर्धक प्रणय पवार हे प्रसिद्ध गायक मंडळी सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल सादर केली. एकाहून एक गीते सादर करीत त्यांनी रसिकांची वाहवा मिळवली तर या सोहळ्याचे निवेदनही तेवढ्याच खुमासदार पद्धतीने सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री दामले यांनी केले. यावेळी वाद्यवृंदावरची साथही तेवढीच ताकदीची होती. तबल्यावर विवेक भागवत, पखवाज, ढोलक आणि ढोलकीवर राजू साळवी, ऑक्टोपॅडवर शशांक खाडकर, बासरी विक्रांत तरे, संवादिनी केदार भागवत, तर कीबोर्ड वर स्वप्नील कदम यांनी साथ दिली.
              दीपावली म्हंटली कि दिव्यांचा, आनंदाचा आणि  संस्कृतीचा सण. या  सणानिमित्त लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वत्र आनंद आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळते. त्यात सुरांच्या अविष्कारांनाही अनन्य साधारण महत्व आहे.  दीपावली सण विविध फराळ, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळी, किल्ले बांधणी, शुभेच्छा आदींचा आगळावेगळा व उत्साहाचा सर्वात मोठा सण असतो, आणि या सणानिमित्त झालेल्या या ‘दिवाळी पहाट’ने वातावरण प्रफुल्लित व उल्हासमय केले. यावेळी वडाळे तलाव परिसर हजारो श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजला होता. या तलावाच्या सौंदर्याने आणि निर्सगाच्या सानिध्यात झालेल्या मैफीलने पहाट ते कोवळ्या उन्हाच्या साक्षीने तेजोमय संगीत बहरत होते.  यावेळी गगन सदन, अबीर गुलाल उधळीत रंग, खेळ मांडीयेला वाळवंटी नाचती वैष्णव, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, माझे माहेर पंढरी, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, उगवला चंद्र पुनवेचा, काटा रुते कुणाला, मी राधिका मी प्रेमिका, दत्त दर्शनाला जायचं जायचं आनंद पोटात माझ्या मायेना, जीव रंगला दंगला असा, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, रेश्माच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यानी, ये मेरी जोहरा जबी, अवघा रंग एक झाला, अशी अभंग, भक्तीगीते, भावगीते, लावणी, चित्रपट गाणी अशी विविध गीते सादर होताना पनवेलकर रसिक प्रेक्षकांनी गायकांना भरभरून दाद दिली. लहानग्यांपासून ज्येष्ठापर्यंत प्रत्यक्ष हजारो रसिक या संगीत फराळाचा आस्वाद घेत असताना थेट प्रक्षेपणातूनही हजारो रसिकांनी लाभ घेतला. यावेळी सर्व उपस्थितांचे आभार श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव माजी सभागृहनेते व कार्यक्रमाचे आयोजक परेश ठाकूर यांनी मानले.
             या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा,जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष पंडित उमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते अजय कांडपिळे, भाजपचे कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, अर्चना ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक हरेश केणी, मनोहर म्हात्रे, मनोज भुजबळ, संतोष शेट्टी, प्रवीण पाटील, बबन मुकादम, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, मंदा भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप, यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, कला, संगीत, वैद्यकीय, विधी आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा संगीतमय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा, युवा मोर्चा आणि भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.