डिजिटल शाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या होणार सर्वांगिण विकास
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सामाजिक दायित्व प्रकल्पाचे उद्घाटन
रत्नागिरी, दि. ७ (प्रतिनिधी): शाळेतील वर्गखोल्यांचे संपूर्ण डिजिटलायजेशन करीत रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा आणि शिक्षण पायाभूत सुविधा विकास कामांचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार बाबर, रत्नागिरी नगर परिषद शिक्षण शाखेचे प्रशासकीय अधिकारी सुनील पाटील तसेच कोटक महिंद्रा बँकेचे उपाध्यक्ष परिक्षीत मसराम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद शाळांना यापुढे सर्वतोपरी मदत करणार असून शाळांतील विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यातच कोटक बँकेचा डिजिटल शाळा बनविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत सामंत यांनी यावेळी व्यक्त केले.
याबाबत कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष आर वर्धराजन, म्हणाले की , “कोटक महिंद्रा बँक ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह वंचित समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज ओळखते. कोटक ही एआयआयएलएसजी सोबत रत्नागिरी जिल्ह्यातील पाच शाळांमधील सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आश्वासक शैक्षणिक वातावरण प्रदान करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. सामाजिक दायित्व प्रकल्पाचे उद्दिष्ट गळतीचे प्रमाण कमी करणे, धारणा दर वाढवणे आणि शाळांमधील अध्यापनाचे परिणाम सुधारणे हे आहे अशी माहिती वर्धराजन यांनी यावेळी दिली.
कोटक महिंद्रा बँक आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट (एआयआयएलएसजी) यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक दायित्व प्रकल्प अंतर्गत शाळांसाठी हा शैक्षणिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ५ शाळांमधील १५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ होणार आहे. दामले विद्यालय, राष्ट्रपिता महात्मा गांधी शाळा, डॉ. अब्दुल कलाम आझाद विद्यालय, पटवर्धन विद्या मंदिर आणि गोलप शाळा शाळांना या सामाजिक दायित्व प्रकल्पाचा लाभ होणार असून या पाच शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये अत्याधुनिक डिजिटल शिक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.