कोरोनाच्या नव्या विषाणूच्या लाटेला रोखण्यासाठी

कोकण विभागातील प्रशासनाने तयारी करावी

– विभागीय आयुक्त विलास पाटील

कोरोना विषाणूच्या ‘ओमायक्रॉन’ या उत्परिवर्तीत विषाणूला अटकाव करण्यासाठी कोकण विभागातील यंत्रणांनी आतापासूनच दक्ष रहावे. विषाणूच्या नव्या प्रकाराला ओळखणारे चाचणी किट्स मिळण्याबाबत पाठपुरावा करावा. कोवीड चाचण्यांची संख्या वाढवावी. तसेच कोकण विभागातील ऑक्सिजन प्लान्टची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. कोविड काळात तयार करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्याचे निर्देश कोंकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी आज येथे दिले.

 कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तीत विषाणूमुळे येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेला अटकाव करण्यासंदर्भात आज विभागीय आयुक्त श्री.पाटील यांनी विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी संभाव्य लाटेच्या तयारीचा आढावा घेतला व पुढील काळात राबवावयाच्या उपाययोजनांबद्दल सूचना केल्या.

कोकण भवन येथे आयोजित या बैठकीस रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील, सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, ठाण्याच्या प्रभारी जिल्हाधिकारी वैदेही रानडे, ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, पालघरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, सिंधुदूर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, मुंबई शहरचे अप्पर जिल्हाधिकारी अरुण अभंग, उपायुक्त (महसूल) मकरंद देशमुख, उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, उपायुक्त (नियोजन) संजय पाटील, उपायुक्त (रोहयो) वैशाली चव्हाण, उपायुक्त (नगरपालिका प्रशासन) रविंद्र जाधव, उपायुक्त (करमणूक) सोनाली मुळे, उपायुक्त (पुर्नवसन) पंकज देवरे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

 श्री. पाटील म्हणाले की, सध्या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तीत विषाणूचा धोका राज्यात येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर कोकण विभागातील प्रशासनाने आतापासून तयारी करावी.  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या लसीकरणाचे प्रमाण 100 टक्के करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवनवीन उपक्रम राबवावेत. लसीकरणाबाबत गावपातळीवर जनजागृती करावी. जिल्ह्यात लसींच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचा तुटवडा होणार नाही, हे पहावे. विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष द्यावे. प्रवाशांच्या विलगीकरणासाठी नियोजन करावे. परदेशातून कोकणात मोठयाप्रमाणात पर्यटक येतात त्यांच्या कोविड चाचण्यांबाबत विशेष नियोजन करावे. कोवीड रुग्ण वाढून पुन्हा लॉकडाऊन लागू नये, या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे यासाठी  पुन्हा जनजागृती करावी. मास्क न वापरणारे, नियम तोडून अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्त पाटील यांनी यावेळी दिले.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विभागातील ज्या ठिकाणी 6 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहेत. त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही आयुक्त पाटील यांनी यावेळी दिले.

ऑक्सिजन निर्मितीवर भर द्यावा

 कोकण विभागात सध्या किती ऑक्सिजन निर्मिती होत आहे. किती प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे, याचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला. त्याअनुषंगाने ऑक्सिजन निर्मिती व साठा वाढविण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

             आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्टवर्क करण्याची संकल्पना यावेळी विभागीय आयुक्तांनी मांडली. सर्व महसूल कार्यालयांनी प्राथमिक तत्त्वावर ई-ऑफिस, ऑनलाईन पेन्शन प्रणालीसारख्या अद्यावत कार्यप्रणालींच्या वापरावर भर देण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी यावेळी केल्या.

यावेळी विविध उपक्रमांच्या अहवालांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच जलजीवन अभियानाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. महाआवास अभियानात कोकण विभागाने राज्यात प्रथम क्रमांकावर राहून उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत आयुक्तांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.