पालिका क्षेत्रातील वाहतुकीशी संबधित समस्या हातळण्यासाठी आणि त्याविषयीचे धोरण बनविण्यासाठी पालिकेत यासाठी एक विशेष विभाग असणे गरजेचे आहे. हा नवीन विभाग बनविण्यासाठी आयुक्त दालनात दिनांक 10 डिसेंबर रोजी झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकित आयुक्त गणेश देशमुख यांनी महत्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे, लेखापरिक्षक विनय पाटील तसेच सर्व विभागप्रमुख, खाते प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.
सिडकोकडून सेवा व सुविधांचे हस्तांतरण करून घेण्याची कार्यवाही महापालिकेडून जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
येत्या काही दिवसात नव्याने होणारी तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रभाग कार्यालये, माता-बाल संगोपन केंद्र बांधणे हे विषय महासभेपुढे मांडण्याच्या दृष्टीने तातडीने काम पुर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
पालिकेच्या इमारतीवर सोलार पॅनेल बसवून उर्जेची बचत करून इमारती स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने नाट्यगृह, अग्निशमन इमारत, एसटीपीच्या इमारती अशा इमारतीवर सोलार पॅनेल बसविण्याच्या निविदा काढण्याविषयीच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या. विकास कामांना गती देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी वेगाने कामे पूर्ण करणाऱ्याच्या सूचना आयुक्तांनी बैठकित दिल्या.