खालापूर तहसीलदार कार्यालय व सहज सेवा फाउंडेशनचा संकल्प प्रयोगाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवा सोबत कापडी बॅगचे अनावरण व जनजागृती
खालापूर (जि. रायगड) / प्रतिनिधी :- प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगचा वापर दैनंदिन जीवनातून कमी व्हावा यासाठी समाज माध्यमातून बरेच प्रयत्न केले जातात. खालापूर तालुका हद्दीतील दुकानात प्लास्टिक कॅरी बॅग ऐवजी आता दोन वेगवेगळ्या नेहमीच्या वापरातल्या कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खालापूर तहसीलदार कार्यालय व सहज सेवा फाउंडेशनचा संकल्प प्रयोगाचा स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून 15 ऑगस्ट 2022 रोजी सरनौबत नेताजी पालकर सभागृह, खालापुर येथे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रेरणेने कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्या हस्ते सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
तसेच या उपक्रमात वापरल्या जाणाऱ्या कापडी बॅगचे अनावरण करण्यात आले.तालुक्यातील दुकानांमध्ये कापडी पिशव्या पुरवल्या जातील. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकाने आपल्या सोबत कापडी कॅरी बॅग अथवा नेण्यासाठी पुरेशी सोय नसल्यास तो संबंधित दुकानदाराकडून डिपॉझिट तत्त्वावर अल्प दरात कापडी बॅग घेऊ शकतो व वापरानंतर तीच बॅग पुन्हा खालापूर तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या कलेक्शन सेंटरमध्ये परत देऊ शकतो. यातून दुकानदारा मार्फत होणारा प्लास्टिकच्या कॅरी बॅगचा वापर कमी होईल तसेच दुकानदारास गिऱ्हाईकासाठी होणारा खर्च कमी होईल तसेच घरून बॅग न आणल्यास अथवा बॅग हवी असल्यास गिऱ्हाईकावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा बोजा पडू नये अशा प्रकारची ही संकल्पना आहे.
तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, व्यापारी असोसिएशन यांच्या सहकार्याने तसेच नगर एनजीओ व नागरीक यांच्यामार्फत सदर उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर खालापूर तालुक्यात राबविण्यात येणार असून या उपक्रमाचे महत्त्व समजून घेवून नागरीक नक्कीच या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देतील अशी सदिच्छा खालापूरचे तहसीलदार अय्युब तांबोळी यांनी व्यक्त केली.
प्रायोगिक तत्त्वावर सुरू होेत असलेला सदर उपक्रम हा भविष्यात मैलाचा दगड ठरेल. भविष्यातील पर्यावरण हानीचा वेध घेवून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपला तालुका प्लॅस्टिक कॅरी बॅग मुक्त करण्याच्या दिशेने पाऊल उचलून आझादीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील नवीन संकल्प यशस्वी करावा, असे आवाहन कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी केले आहे.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर, महीला संघटक निलम पाटील, जन संपर्क प्रमुख जयश्री कुळकर्णी, आयुब खान, तुषार अगरवाल, योगिता जांभळे, डॉ. रक्षा माळोदे, परवेझ खान, नम्रता परदेशी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकी भालेराव तसेच आभार विशाल उशिरे यांनी मानले.यावेळी खालापूरचे तहसीलदार अय्युब तांबोळी, नायब तहसीलदार राजश्री जोगी, खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र फक्के, साजगाव विभागाचे तलाठी भरत सावंत, उद्योजक हरीश काळे, उद्योजक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी खालापूर तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सेल्फी पॉइंटचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्या हस्ते करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या परिसरात तहसीलदार कार्यालय व सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून उभारलेल्या स्वतंत्र भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या माहितीच्या बॅनरचे अजित नैराळे व तालुक्यातील नागरिकांनी भरभरून कौतुक केले.