तळोजा फेज-१ येथील मशीदीसमोर अटक करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्यांची सुटका
तळोजा फेज-१ येथील मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यासाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना काल (बुधवार, ४ मे) तळोजा पोलिसांनी अटक केली होती.
अटक करण्यात आलेल्या मनसेचे पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांच्यासह ९ जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने आज (गुरूवार, ५ मे( त्यांची सुटका झाली आहे.
अजानच्या वेळी मशिदींसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले होते.
या पार्श्वभूमीवर मनसेचे पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे कार्यकर्ते तळोजा फेज-१, येथील मशीदीसमोर हनुमान चालीसा लावण्यासाठी आले होते. ‘दुपारी नमाजाची बांग झाल्यास आम्ही मशीदीसमोर हनुमान चालीसा लावणार, परंतु अजान न झाल्यास मुस्लिम बांधवांचे स्वागत असेल, अशी अशी प्रतिक्रिया मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी वेळी दिली होती.
दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, अजान होण्यापूर्वीच मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. यामध्ये रामदास पाटील, कैलास माळी, संजय तन्ना, योगेश पाटील, सुरज गायकर, कांतीलाल पाटील, रोशन पाटील, राजेश पाटील यांचा समावेश होतो.
आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाकडून या सर्वांना जामीन मंजूर केल्याने त्यांची सुटका झाली आहे. दरम्यान, ‘यापुढेही महाराष्ट्र सैनिक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करतील’ अशी प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांनी दिली आहे.