नव उद्योजकांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा
राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने या महामंडळाची स्थापना केली आहे. महामंडळामार्फत छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष पर्यत) व गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष ते 50. 00 लक्ष पर्यंत) या ऑनलाईन योजना राबविण्यात येतात. सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता विविध कर्ज योजनांचे रायगड जिल्हा कार्यालयास उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (भौतिक उद्दीष्ट 100) व गट कर्ज ब्याज (भौतिक उद्दीष्ट 10) या योजनांकरीता महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष पर्यंत) :-ही योजना संपूर्णपणे संगणीकृत आहे. या योजनेमध्ये बँकेने रु.10.00 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादित) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. या योजनेचा कालावधी 5 वर्ष असेल. या योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8.00 लक्ष पर्यंत. (सक्षम प्राधिकर दिलेल्या प्रमाणपत्रानुसार), कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराचे आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य महामंडळाच्या www.vjnt.in या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जाईल. अर्जदारास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल.
गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंत) : विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरिता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8.00 लक्ष पर्यंत असलेल्या उमेदवारांच्या गटास बँकेकडून रु.10.00 लक्ष ते रु. 50.00 लाख पर्यंत मंजूर उद्योग उभारणीकरीता कर्ज उपलब्ध केले जाईल. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45असावे
*परतफेडीचा कालावधी-* मंजूर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल तो. कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर (जास्तीत जास्त 12 टक्के व्याज दराच्या मर्यादेत) त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळाच्या www.vjnt.in या वेबपोर्टलदुमारे गटाचा ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळाच्या www.vjnt.in व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे गटाचा ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of Intent) दिले जाईल. गटास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल.
तरी इच्छुक, गरजू विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गतील व्यक्तींनी योजनांच्या अधिक माहितीकरिता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळचे जिल्हा कार्यालय :- श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या., सदनिका क्र. 01, तळमजला, चेंढरे, अलिबाग, दूरध्वनी क्रमांक :-02141-221307 वा ई-मेल vnvintdcraigad3@gmail.com येथे संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे वसंतराव नाईक विजाभज महामंडळाचे अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर यांनी कळविले आहे
इतर मागासवर्गीय उद्योजकांना सूवर्णसंधी
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग कल्याण महामंडळाच्या विविध कर्ज योजनेंतर्गत एकूण 20 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर
राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे. या योजनेंतर्गत आज जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वैयक्तीक कर्ज व्याज परताव्याची 19 लाभार्थ्यांची तसेच गट-कर्ज व्याज परताव्याच्या 1 लाभार्थ्याची अशा एकूण 20 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर केली.
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड चे जिल्हा व्यवस्थापक श्री.निशिकांत नार्वेकर व इतर समिती सदस्यांनी या 20 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर केली.
समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.1.00 लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज नाही) व 20 टक्के बीज भांडवल योजना तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष पर्यत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे.
या निमित्ताने इच्छुक, गरजू इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील जास्तीत जास्त लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
तसेच जिल्ह्यातील इच्छुक, गरजू इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेच्या अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट देवून शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड चे जिल्हा कार्यालय, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या., सदनिका क. 101, पहिला मजला, चेंढरे, अलिबाग, (दूरध्वनी क्र.-02141-224448) अथवा ई-मेल आयडी- dmobcalibagraigad@gmail.com येथे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर (मो.9869281787) तसेच उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील (मो.9096261053) यांच्याशी संपर्क साधावा.