पनवेलच्या सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकापची सत्ता
11 सदस्यांची झाली बिनविरोध निवड
ही तर आगामी निवडणुकीची नांदी
– आमदार बाळाराम पाटील.
प्रतिनिधी :-
पनवेल तालुका सहकारी भात गिरणीची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी पनवेलच्या विठोबा खंडाप्पा विद्यालयामध्ये संपन्न झाली.यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या ११ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जवळपास साडेसातशे शेतकरी सदस्यांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. या बिनविरोध सदस्य निवडीमुळे ग्रामीण विभागातील राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाची मजबूत पकड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा विजय म्हणजे आगामी निवडणुकीची नांदी आहे अशी प्रतिक्रिया आमदार बाळाराम पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेनंतर दिली.
रविवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक दत्तात्रय धायगुडे यांनी निवडणुकीच्या कामकाजास सुरुवात केली. सार्वत्रिक सभांच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले असल्या कारणामुळे, शेतकरी सभासद यांच्या सार्वत्रिक सभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या ११ सदस्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.यामध्ये मनोहर पाटील,राजेंद्र घरत, दत्तात्रय मोरे, रवींद्र पाटील, गणेश गायकर, दिनकर मुंढे, नारायण तुपे, गणेश कोळी, अनंता कांबळे, मीरा म्हात्रे, लिला भस्मा. आधी मान्यवरांची बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाली असून वामन शेळके यांची तज्ञ संचालक म्हणून फेर निवड करण्यात येणार आहे. सहकारी भात गिरणी मध्ये सत्ता असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाने अत्यंत उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. या ठिकाणी बाजार भावापेक्षा जास्त हमीभाव देण्यात सहकारी भात गिरणी ला यश आल्यामुळेच उत्स्फूर्तपणे शेतकरी बांधव या प्रक्रियेत सहभागी झाल्याचे दिसून येत होते. तसेच लाभार्थ्यांचा लाभ हा थेट त्यांच्या खात्यावर जमा होत असल्याने भात विक्रीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक झालेली आहे.
यानंतर प्रसिद्धीमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, नुकतीच गव्हाण येथील विविध सोसायट्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली, कर्नाळा बँकेतील ठेवीदारांच्या व खातेदारांच्या विमा संरक्षित रकमा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, आणि आज सहकारी भात गिरणी वरती पुन्हा एकदा लालबावटा फडकला. शेतकरी कामगार पक्ष संपला असे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा असा हा आजचा नेत्रदीपक विजय आहे. तर आपले मनोगत व्यक्त करताना पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील म्हणाले की शेतकरी कामगार पक्षाच्या सुवर्णकाळात अशाप्रकारे उत्स्फूर्तपणे शेतकरी सभासद निवडणुकी मध्ये सहभागी होत असत, दरम्यानच्या कालखंडात आम्हाला संघर्ष करावा लागला, परंतु आज ज्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षावरती विश्वास ठेवणारे शेतकरी बांधव उत्स्फूर्तपणे या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झाले ते पाहून खरोखरच समाधान लाभत आहे.
यावेळी बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्यासाठी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील, माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, तालुका चिटणीस राजेश केणी, रा जी प सदस्य राजू गणा पाटील, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी,नामदेव शेठ फडके, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील,देवेंद्र मढवी, दिपक पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.