तळोजा येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तान हस्तांतरित करून दफन विधी खुली करण्यासाठी मंजूरी, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश
पनवेल : पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा १९ एप्रिल रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. या सभेत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यानी मागणी केलेल्या तळोजा येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तान हस्तांतरित करून दफन विधी खुली करण्यासाठी मंजूरी मिळाली. तसेच अग्निशमन दलासाठी 15 कोटी रुपयांची वाहन खरेदी करण्यासाठी मंजूरी मिळाली आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा फेस 1, सेक्टर 15 येथील भूखंड क्रमांक आठ/ नऊ येथे सिडको प्राधिकरणामार्फत सुसज्ज दफनभूमी तयार करण्यात आली आहे. पालिकेने सिडकोसोबत हस्तांतरणाची कार्यवाही केली नसल्याने कब्रस्तान दफन विधी करता खुले करण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील मुस्लिम समाज बांधवांना दफन विधी करता पनवेल, खारघर , मुंबई येथे जावे लागते त्यामुळे कुटुंबीयांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तळोजा येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तान हस्तांतरित करून दफन विधी खुली करण्यासाठीची मागणी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेवक सतीश पाटील यानी केली होती. या मागणीला सर्वसाधारण सभेत मंजूरी मिळाली आहे. तसेच अग्निशमन दलासाठी 15 कोटिंची वाहन खरेदी करण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. एकूण 110 चौरस किलोमीटर इतके कार्यक्षेत्र असलेल्या पनवेल महानगरपालिका अग्निशामक विभागामार्फत नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे बचाव कार्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेले फायरफाईटींग वाहने असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मल्टीपर्पज फायर इंजिन, रॅपिड इंटर्वेंशन व्हीकल, मल्टीपर्पज टर्न टेबल लँडर, वॉटर टँकर ही पाच वाहने पनवेल पालिका खरेदी करणार आहे. नगरसेवक सतीश पाटील, डॉ सुरेखा मोहोकर यांच्यासह महाविकास आघाडीने विशेष प्रयत्न करून कब्रस्तान हस्तांतरित करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. कब्रस्तान आणि अग्निशामक दलासाठी वाहन खरेदी करण्यासाठी मंजूरी मिळाल्याबाबत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेवक सतीश पाटील आणि महाविकास आघाडीने आयुक्त गणेश देशमुख, प्रशासन यांचे आभार मानले आहेत.
कामोठे, खांदा कॉलनी , तळोजे, ग्रामीण भाग येथे फायर स्टेशन उभारणे.तसेच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना जॅकीट, गंबूट, ग्लोज पुरवावेत, आणि खेडेगावात आग विझविण्यासाठी छोटे पिकअप खरेदी करुन विमा कवचाचे संरक्षण देणे अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी केली आहे. बऱ्याच वर्षांपासून रखडलेला प्रश्न तळोजा येथील मुस्लिम बांधवांच्या एकजुटीने आणि पाठपुराव्याने आज मार्गी लागला आहे- प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल पालिका दफ़नभूमित पालिकेचे कर्मचारी नेमणे गरजेचे आहे. विषय मार्गी लागल्याबद्दल आयुक्त, प्रशासन यांचे आभार मानते .