निसर्ग हिच खरी संपत्ती आहे. निसर्गाचे जतन करणे, हा एकमेव पर्याय माणसाकडे उपलब्ध आहे. दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या कचऱ्यांपैकी 30 % कचरा हा स्वयंपाक घरातील आणि वाया गेलेल्या अन्नाचा असतो. त्यामुळे अन्न वाया घालवू नये, हे संस्कार प्रत्येक गृहिणीने आपल्या मुलांना दिले पाहिजे, जेणेकरुन कचरा उत्पत्ती कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन निसर्गगुण या बायोगॅस् संयंत्राचे जनक आणि भाभा ऑटोमिक संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी केले. खारघर येथील रघुनाथ विहार याठिकाणी 02 डिसेंबर 2021 रोजी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन, वर्गीकरण बाबत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. काळे बोलत होते.

यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे, सहायक आयुक्त डॉ. वैभव विधाते, बिर्र्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील तसेच महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. काळे म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापन ही आज काळाची गरज बनली आहे. आपल्या मुलभूत गरजांमध्ये घनकचरा व्यवस्थापन ही सुध्दा एक भाग बनली आहे. आपल्या घरामध्ये दैंनदिन निर्माण होणारा कचरा घराबाहेर जाणार नाही, याची दक्षता प्रत्येक गृहिणीने घेतली पाहिजे.

या प्रसंगी आयुक्त गणेश देशमुख यांनी घनकचरा व्यवस्थापन व वर्गीकरण बाबत माहिती दिली. तसेच स्वच्छतेच्या बाबतीत नागरीकांमध्ये जनजागृती करुन स्वच्छतेच्या सवयी अंगी बिंबविण्यासाठी नागरीकांना आवाहन केले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 ची प्रभावी अमंलबजावणी पनवेल महापालिका क्षेत्रात सुरू आहे. या अंतर्गत जनजागृतीपर ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत याच पध्दतीने घनकचरा व्यवस्थापन व वर्गीकरण बाबतची दुसरी कार्यशाळा आरएएफ बटालियन कॅम्प, खारघर येथे घेण्यात आली. या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.