पनवेल तालुका पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर  यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलीस मेडल मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे बहाल 

पनवेल वार्ता

रविंद्र दौंडकर यांचे वडील स्वर्गीय .ह.भ.प.रंगनाथ बाबा दौंडकर हे वारकरी संप्रदायात कार्यरत होते, त्यामुळे संस्काराची शिदोरी त्यांना बालपणीच मिळाली. बीकॉम पदवी घेतल्यानंतर रविंद्र दौंडकर हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा प्रथम प्रयत्नात महाराष्ट्रात ५०व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. 

पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झाली. महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे खडतर प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन, गोवंडी येथे १९९६ साली सेवेत रूजू झाले. आजतागायत मुंबई, ठाणे, पुणे, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात त्यांनी आतापर्यंत 28 वर्ष कर्तव्य बजावले आहे .रविंद्र दौंडकर यांनी पोलीस खात्यातील सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला आहे. पोलीस सेवेत असताना कायद्याचे सखोल ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने त्यांनी एल.एल.बी व एल.एल.एम या पदव्याही संपादन केल्या आहेत.

कनेरसर गावातील अनेक धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असते. पोलीस खात्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना 500 पेक्षा जास्त बक्षीसे व प्रशंसापत्रासहित रोख रक्कम रू.4 लाख पेक्षा जास्त मिळाली आहे. रविंद्र दौंडकर यांनी अनेक गंभीर गुन्हे आपल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे उघडकीस आणलेले आहेत. त्यामुळे तत्कालीन स्वर्गीय गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते बेस्ट डिटेक्शन ऑफीसर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील संवेदनशील अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. २००८ साली सहाय्यक पोलीस निरीक्षक व २०१३ साली पोलीस निरीक्षकपदी त्यांची पदोन्नती झाले. ठाणे येथे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे प्रमुख म्हणून कार्यरत असताना बांगलादेश, नेपाळ वा इतर देशांतून मुंबई येथे होत असलेला अनैतिक मानवी वाहतूक बाबींचा व्यापार याबाबत कठोरपणे कारवाई केली. आपल्या आजपर्यंतच्या कार्यकाळात रविंद्र दौंडकर यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना जेरबंद केले व त्यांचेविरुद्व सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र दाखल करून दोषसिद्धी मिळविली आहे. कर्तव्य कठोर परंतु समाजासाठी तळमळ व्यक्त करणारे दौंडकर हे सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सहभागी होतात. कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने मुंबईतून लोक मोठ्या संख्येने बाहेरगावी जात होते. रविंद्र दौंडकर तेव्हा वाशी पोलीस स्टेशनला कार्यरत होते. त्यांनी लोकांसाठी बिस्किटे, फळे,खाद्यपदार्थ याचे वाटप वरिष्ठ अधिकारी यांच्या सहकार्याने केले. अत्यवस्थ असलेले अनेक कोरोना पेशंटना त्यांनी तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत. सॅनिटायजर, मास्क, प्रतिबंधक गोळ्या याचे वितरण पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच व्यावसायिक, नोकरवर्ग यांना केले.

रविंद्र दौंडकर यांनाही कोरोनाने गाठले ,त्यावर मात करून ते पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले.गेली दोन वर्षांपासून ते  पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी पाहत असताना कोरोना संकटकाळात सर्वतोपरीने नागरिकांमध्ये जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. रविंद्र दौंडकर यांच्या कार्याची दखल वेळोवेळी सामाजिक संस्थांबरोबरच पोलीस खाते व शासनानेही घेतली आहे. १ मे २०१८ रोजी त्यांना पोलीस खात्यातील मानाचे “पोलीस महासंचालक पदक “मिळाले आहे. पोलीस खात्यामधील  राष्ट्रपती पोलीस पदक हा सर्वोच्च सन्मान आहे. रविंद्र दौंडकर यांना २६जानेवारी २०२१ रोजी गुणवत्तापुर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलीस मेडल मिळाल्याचे जाहीर झाले व सदर मेडल त्यांना दि.13/10/2022 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे बहाल करण्यात आले आहे. त्यांच्या सेवाकार्याला उचित असा बहुमान मिळाला. रविंद्र दौंडकर हे खेड तालुक्यातील कनेरसर गावचे रहिवासी असल्याने त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.