मुंबई मेट्रो रेल्वे मध्ये 200 अधिकारी-कर्मचारी नियुक्त
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार असल्याने सिडको तर्फे प्रयत्न चालू आहेत. नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्गावरील काही स्थानकांचे अपूर्ण काम असल्याने भरती प्रक्रिया होत नव्हती. पण आता मार्च महिन्यात नवी मुंबई मेट्रो रेल्वे सुरु होणार असल्याने ‘महामेट्रो’ने मेट्रो रेल्वेसाठी आवश्यक अधिकारी- कर्मचारी यांची भरती करण्यात आली असून, कर्मचारी वर्गास विविध प्रकारचे प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे.
लोहमार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे’च्या सर्व डबे आणि विद्युत यंत्रणेला भारतीय रेल्वे मंडळाकडून नुकतीच हरीझंडी मिळाली आहे. गेल्या वर्षी या मार्गाची ऑसिलेशन, विद्युत, अत्यावश्यक ब्रेक यांच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून, आरडीएसओ या रेल्वे संस्थेकडून सुरक्षेच्या अनुषंगाने अधिकृत प्रमाणपत्रेही मिळाली आहेत. तांत्रिक कामांची पाहणी झाल्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आणि रेल्वे प्रशासनाकडून नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे मेट्रोसाठी लागणारे तज्ञ अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आले आहे. पेंधर, तळोजा पेठाली, अमनदूत, पेठपाडा आणि सेंट्रल पार्क स्थानक दरम्यान धावणार्या तीन डब्यांची नवी मुंबई मेट्रो रेल्वे सुरु झाल्यावर त्यासाठी लागणारे ट्राफिक कंट्रोलर, डेपो कंट्रोलर, रेल्वे गार्ड, ट्रेन ऑपरेटर, तिकीट काउंटर आदी अधिकार्यांची वर्तमान पत्रात जाहिरात देवून भरती करण्यात आली आहे. भरती केलेले अधिकारी विविध मेट्रो मध्ये काम केलेले तज्ञ, प्रशिक्षित आहेत. तसेच मेट्रो रेल्वे स्थानकावर सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि स्टेशन स्वच्छतेसाठी स्वीपर आदी जवळपास दोनशे अधिकारी- कर्मचारी मनुष्यबळाची भरती करण्यात आली आहे. दरम्यान, ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे’ मध्ये भरती करण्यात आलेले सर्व अधिकारी-कर्मचारी अनुभवी आहेत. नवी मुंबई मेट्रो रेल्वे स्थानकांची सुरक्षा कशा प्रकारे असावी, यासाठी सुरक्षा अधिकार्यांकडून सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नवी मुंबई मेट्रो रेल्वे सुरु झाल्यावर कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण येणार नाही, अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्व अधिकारी-कर्मचारी यांना देण्यात आले आहे, असे ‘महामेट्रो’च्या अधिकार्यांनी सांगितले.