बेरोजगार युवक-युवतींनी लाभ घेण्याचे संचालक आनंद राठोड यांचे आवाहन

बेरोजगारीवर मात करण्यासाठी RUDSETI च्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये RSETI ची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत बेरोजगारांना दिल्या जाणाऱ्या विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाचा लाभ युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक आनंद राठोड यांनी केले आहे.

              केंद्र शासन आणि राज्य शासन संस्थेचे भागधारक असून रायगड जिल्ह्यामध्ये बँक ऑफ इंडिया कडून पुरस्कृत आहे. स्टार स्व-रोजगार प्रशिक्षण संस्थान, रायगड (आरसेटी रायगड) ची स्थापना डिसेंबर 2010 मध्ये झाली असून आतापर्यंत 7 हजारपेक्षा अधिक बेरोजगारांना विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात आले आहे.

            आरसेटी रायगडतर्फे मोफत विविध व्यवसायाभिमुख कौशल्य प्रशिक्षण राबविले जातात. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवक-युवतींना स्वरोजगाराचे धडे शिकवले जातात.

            प्रशिक्षणाच्या माध्यमातून अकुशलतेकडून कुशलतेकडे जाणाऱ्या या प्रवासामध्ये प्रशिक्षणार्थीना उद्योजकतेचे महत्व, उद्योजकतेचे गुण, आत्मविश्वास बांधणी, संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन, बँकिंग विषयी माहिती, प्रकल्प अहवाल, यशस्वी उद्योजकांसोबत चर्चा, प्रकल्पास भेट आणि विविध विषयातील प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते.

              संपूर्ण प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षणादरम्यान चहा, नाश्ता आणि जेवण तसेच निवासाची सोय (आवश्यक असल्यास) तसेच प्रशिक्षण साहित्याची सोय मोफत केली जाते.

             आरसेटी रायगड मार्फत शेळी पालन, कुक्कुट पालन, मसाले, पापड बनविणे, कृत्रिम दागिने बनविणे, फास्ट फूड उद्यमी, पर्यटन, शिवणकला, पेपर बॅग्स व पाकिटे बनविणे इत्यादी विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते.

             प्रशिक्षण कालावधी कमीत कमी 6 दिवस ते 30 दिवसांपर्यंत असतो. 18 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील सर्व बेरोजगार युवक-युवती प्रशिक्षणासाठी पात्र असतात.

             प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींचे NSQF भारत सरकार यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार मूल्यांकन करून प्रमाणपत्र देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थीना 2 वर्षांपर्यंत पाठपुराव्यसह व्यवसाय सुरु करण्यासाठी मदतही केली जाते.

            तरी या संस्थेकडून पुरविल्या जाणाऱ्या या मोफत प्रशिक्षण सुविधेचा जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक आनंद राठोड यांनी केले आहे.

Director

Bank of India SSPS Pantnagar, Alibag, Raigad-402 201, Maharashtra

02141-282214

rseti.raigad@bankofindia.co.in

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.