विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, महाराष्ट्र प्रांत विवेक चेतना-२०२१अंतर्गत “ध्यास सेवेचा” या उपक्रमाचा एक भाग म्हणून दि.१९ नोव्हेंबर २०२१ला विवेकानंद केंद्राचे संस्थापक मा.एकनाथजी रानडे यांच्य जयंती “साधना दिवस” व सेवेचे व्रत ज्यांनी आपल्या अनुयायांना दिले ते शिखांचे आद्यगुरू नानक देव यांच्या जयंतीच्या औचित्याने संपूर्ण महाराष्ट्र प्रांतात विवेकानंद केंद्राच्या बहुतांश शाखांनी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आणि या शिबिरात 322 बॅग रक्त संकलित करून समाजाची विशेषतः गरजू रुग्णांकरीता रक्त पुरवठा करून मानव सेवेसाठी तत्परता दाखविली.
दादर, विले पार्ले (मुंबई), डोंबिवली, पुणे, सोलापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, वर्धा व नागपूर येथे स्थानिक केंद्र कार्यकर्ते व युवकांनी उत्साहाने रक्तदान शिबीरात सहभाग घेतला. या वेळी मा. एकनाथजी यांच्या कार्याविषयी व गुरू नानक देव यांच्या अध्यात्मिक विचारांवर मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थितांना रक्तदानाची गरज, महत्व व आरोग्यासाठी आवश्यक आहार याबाबत देखील डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. सर्वच रक्तदात्याना फलाहार व केंद्र परिचयाची पुस्तिका देण्यात आली.
सर्वच ठिकाणी विवेकानंद केंद्राचे प्रांत प्रमुख अभय बापट, प्रांत संघटक सुश्री सुजाता दळवी सर्व विभाग प्रमुख,स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनात व इतर सामाजिक संघटनांच्या सहकार्याने राष्ट्रहिताच्या दृष्टीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
येत्या आठवड्यात ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, कोल्हापूर व इतर ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात येईल अशी माहिती विवेकानंद केंद्राच्या वतीने देण्यात आली.