रायगड जिल्हा प्रशासनाच्या कामगिरीत मानाचा तुरा..!

कातकरी उत्थान अभियानांतर्गत “सप्तसूत्री” च्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना SKOCH अवॉर्ड जाहीर

*अलिबाग (जिमाका):-

रायगड जिल्ह्यातील आदिवासी कातकरी बांधवांच्या प्रगतीसाठी मागील वर्षभरात कातकरी उत्थान अभियानांतर्गत “सप्तसूत्री”च्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी राबविलेल्या उपक्रमाची SKOCH अवॉर्ड्स या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर या पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे.
SKOCH समूह हा 1997 पासून सर्वसमावेशक वाढीवर लक्ष केंद्रित करून सामाजिक-आर्थिक समस्या हाताळणारा भारतातील अग्रगण्य थिंक टँक आहे. SKOCH समूह धोरणात्मक निर्णयांमध्ये भारतीय समाज व्यवस्थेची गरज व त्यातील संदर्भ आणण्यासाठी सहकार्याची भूमिका बजावतो. त्यासोबतच फॉर्च्यून-500 कंपन्या, सरकारी मालकीचे उद्योग, शासनाशी विविध प्रकारे संलग्न आहे. यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये क्षेत्रीय हस्तक्षेप, सल्लागार, संशोधन अहवाल, प्रभाव मूल्यांकन, धोरण संक्षिप्त, पुस्तके, जर्नल्स, कार्यशाळा आणि परिषदांचा समावेश आहे. SKOCH समूहाकडून शासन, वित्त, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि सामाजिक क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च स्वतंत्र नागरी सन्मान प्रदान करण्यात येतात.
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे दि.24 ऑगस्ट 2021 रोजी रायगड जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. जिल्ह्याचा अभ्यास करून येथील आदिवासी-कातकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रशासकीय अधिकारी, आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था यांच्या एकत्रित विचार मंथनातून “सप्तसूत्री कार्यक्रम” आखला. या सप्तसूत्री कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने “आरोग्य/बालविवाह रोखणे”, “कृषी विषयक योजनांची माहिती देवून अंमलबजावणी करणे”, “स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व अभ्यासिका/ ग्रंथालय”, “सर्व प्रकारच्या दाखल्यांचे वाटप रेशन कार्ड/आधार कार्ड वाटप”, “स्थलांतरण थांबविणे व रोजगार निर्मिती”, “वन हक्क अधिनियम 2006 ची अंमलबजावणी”, याचा समावेश करण्यात आला. या सप्तसूत्रीच्या विविध नियोजनबद्ध उपक्रम, कार्यक्रम, मेळावे, शिबिरे घेण्यात आली.
या पुरस्कारासाठीची पहिल्या टप्प्यावरील कार्यवाही साधारणत: मार्च 2022 पासून सुरु झाली. दुसऱ्या टप्प्यात सादरीकरणासाठी निवड, तिसऱ्या टप्प्यात राबविलेल्या उपक्रमाच्या पडताळणीसाठी निवड, चौथ्या टप्प्यात तज्ञांचे मत, उपक्रमाची लोकप्रियता याचे गुणांकन, पाचव्या टप्प्यात आदिवासी-कातकरी बांधवांच्या समस्या, त्या सोडविण्याकरिता करण्यात आलेले उपाय, त्याचे परिणाम तसेच सप्तसूत्रीची अंमलबजावणी करताना येणारी आव्हाने, नवकल्पना व प्रतिकृती आदींचे सादरीकरण आणि शेवटच्या टप्प्यात हे सादरीकरण केल्यानंतर जवळपास 500 हून अधिक नामांकनांमधून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील “सप्तसूत्री” कार्यक्रमाकरिता जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर व रायगड जिल्हा प्रशासनास “जिल्हा प्रशासन” या संवर्गातील “रौप्यपदक” जाहीर करण्यात आले. अशाप्रकारे हे अतिशय अवघड टप्पे पार पाडल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा प्रशासनाला हे यश प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.