भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हातर्फे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संगीत, नृत्य व नाटकांची मेजवानीने परिपूर्ण अशा “मनोरंजन अनलॉक – २.०” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रंगभूमी अनलॉक झाल्याने नागरिकांनी कार्यक्रमाचे स्वागत तसेच आयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले.

पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २२) झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सांस्कृतिक सेलचे प्रदेश अध्यक्ष, लातूर मनपाचे गटनेते शैलेश गोजमगुंडे, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, चिन्मय समेळ, सांस्कृतिक सेलचे प्रदेश सहसंयोजक उमेश घळसाथी, प्रदेश सदस्य सुजित सिन्हा, सांस्कृतिक सेलचे शहर सहसंयोजक गणेश जगताप, संजीव कुलकर्णी, अमोल खेर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्जन्य रोगाचा प्रबंध व नियंत्रण उपाय म्हणून पनवेल महानगरपालिका क्षेत्र तसेच संपूर्ण राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून नाट्यगृह संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. परंतु नुकतेच काढलेल्या परिपत्रकामध्ये २२ ऑक्टोबर २०२१ पासून नाट्यगृह सुरु करण्यात यावे असे जाहीर करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने “मनोरंजन अनलॉक – २.०” – संगीत, नृत्य व नाटकांची मेजवानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये “नृत्य आराधना कलानिकेतन ग्रुप, आदई” आणि स्टार प्लस वरील डान्स प्लस ५ फेम “पनवेलकर्स ग्रुप” यांनी नृत्य सादर केली. तसेच “सामगंध ग्रुप,पनवेल” हे सुरेल गाण्यांची मैफिल यावेळी रंगली. त्यानंतर अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे विजेते ‘कलांश थिएटर, रत्नागिरी तर्फे ‘बारस’ ” हे धमाल विनोदी नाटक सादर झाले. या सर्व मनोरंजनात्मक कार्यक्रमाला रसिकांनी उदंड प्रतिसाद देत आयोजकांना या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल धन्यवाद दिले.

 

 

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.