विषारी आणि हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ – माधव भंडारी
 
पनवेल   (प्रतिनिधी)
 राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी करून विषारी आणि हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ जनतेवर आली आहे, असे सूतोवाच आज(मंगळवार, दि. १७ मे) पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.  पनवेल तालुका व शहर  भाजपच्या मध्यवर्ती कार्यलयात झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत जुमलेदार उपस्थित होते.
          महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गुंडगिरीची भाषा केली जात आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शोधा आणि फोडा असे आवाहन कार्यकर्त्याना केले गेले. आणि हे उघड्या डोळ्याने दिसतानाही महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या मूक संमतीनेच महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला आहे कि काय असा सवालही माधव भंडारी यांनी उपस्थित केला. अंतर्गत सत्तासंघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालविलेला धुडगूस आणि दहशतवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करू द्यावे, असा सल्लाही माधव भंडारी यांनी यावेळी दिला. गुंडगिरी आणि दहशतवाद माजविणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनच पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, असा आरोप करून, संयमी राजकारण करणारे शरद पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.
      माधव भंडारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुढे म्हंटले कि, आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सत्ताधाऱ्यांच्या प्रोत्साहनातून ठिकठिकाणी कायदा हातात घेऊन दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत. सरकारकडूनच अशा प्रकरणांतील गुन्हेगारांना संरक्षणही मिळत असल्यामुळे सामान्य जनतेचा शांततेने जगण्याचा हक्कच संपुष्टात आला आहे. पोलीस यंत्रणेस वेठीला धरून सत्ताधारी पुरस्कृत दहशतवादामुळे राज्यात अशांतता माजली असून विरोधकांना दहशतीच्या मार्गाने संपविण्याचा कुटिल डाव सत्ताधारी पक्षाने आखला आहे. पालघरमधील साधूंचे हत्याकांड, मंत्री आव्हाड यांच्या बंगल्यावर करमुसे नावाच्या अभियंत्यास पोलिसांदेखत झालेली मारहाण, किरीट सोमय्या, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यावरील जीवघेणा हल्ला, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात दहशत माजविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न, आणि पोलिसांनी अटक केल्यानंतरही एका अभिनेत्रीस मारहाण करण्याचा प्रयत्न या सर्व घटना राष्ट्रवादीने कायदा हातात घेतल्याचे पुरावे आहेत. राज्याचे गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असल्यामुळे दंगेखोर कार्यकर्त्यांवर कारवाई न करता दहशतवादास सामोरे जाणाऱ्यांवरच कारवाई केली जात असल्याने, सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याची शंका बळावते असे ते म्हणाले. केतकी चितळे प्रकरणानंतर जाहीर पत्रक काढून मारहाण करण्याच्या, तोडण्याचा आदेश दिला जात असताना पोलिसांनी व सरकारने पाळलेले मौन म्हणजे या कटाचाच पुरावा आहे, असेही माधव भंडारी यांनी अधोरेखित केले. 
          शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावरील वैयक्तिक टीका असमर्थनीय आहे. पण कायदेशीर कारवाई सुरू असतानाही मारहाणीचे आदेश देणे व दहशत पसरविणे यातून राज्याची कायदा सुव्यवस्था संपविण्याचा कट उघड होतो, असेही ते म्हणाले. २५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा या उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे वैफल्य आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्याला वेठीस धरत असतील, तर पवार यांनी त्यांना आवर घालावा असे आवाहनही त्यांनी केले. 
————– ////////////————–//////////////–/////////——/
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.