करंजाडे येथील गाढी नदीवरील पत्री पूल कोसळला
दुचाकींचा अपघात होतानाच वाचला
रामेश्वर आंग्रेचा पूल दुरुस्तीसाठी पारेषण टाटा पॉवर कंपनीकडे सुरु होता पाठपुरावा
पनवेल/प्रतिनिधी — करंजाडे ते भिंगारी सब स्टेशन मधील धोकादायक पत्री पुल गुरुवारी दुपारी अचानकपणे कोसळला. यावेळी या पुलावरून एक दुचाकीस्वार पूल ओलांडताच या पत्री पुलाचा मधला भाग कोसळला. मात्र यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत हा पूल दुरुस्त करण्याकरिता पारेषण विभाग, टाटा पॉवर कंपनीकडे गेल्या दोन वर्षांपासून करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा पाठपुरावा सुरु होता. या घटनेची माहिती मिळताच सरपंच रामेश्वर आंग्रे, ग्रामपंचायत सदस्य, पारेषण विभाग, टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी व पनवेल महापालिकेचे अधिकाऱयांनी पाहणी केली व माहिती घेतली.
टाटा पॉवर कंपनी मार्फत गाढी नदीवर बऱ्याच वर्षापूर्वी करंजाडे भिंगारी सब स्टेशन यांना जोडण्यासाठी पत्री पुलाची उभारणी करण्यात आली आहे. परंतु सदर पुलाची अतिशय दुरावस्था झाली असुन तो पुल वापरण्यास अयोग्य आहे. पत्री पुल धोकादायक झाला असुन तो पावसाळ्यामध्ये पुरात वाहून जाऊ शकतो व त्या ठिकाणी मोठी जीवित हानी होऊ शकते. करंजाडे येथे शहरीकरण झाले असुन येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. येथील नागरिक पनवेल बस स्थानक, रेल्वे स्टेशनकडे जुना पनवेल उरण रस्त्याचा वापर करीत असतात. परंतु उरण नाका येथील रस्त्यावर उरण नाका येथे नेहमी वाहतूक कोंडी होत असल्याने करंजाडे येथील नागरिक पनवेल बस स्थानक व रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणुन या पत्रीपुलाचा वापर करतात. त्याचबरोबर पनवेलमधील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रमाण पाहता करंजाडे मधील नागरिकांना पनवेल येथे जाण्यासाठी करंजाडे – भिंगारी हा रस्ता सोयीचा असल्याने करंजाडे येथील नागरिकांकडून या पुलावापर होत होता. यावेळी या पुलाच्या दुरुस्ती बाबत करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा गेल्या एक ते दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. मात्र संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले. मात्र गुरुवारी दुपारच्या सुमारास या पुलावरून पूल ओलांडत असताना अचानकपणे पुलाचा मधला भाग कोसळला. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच रामेश्वर आंग्रे, ग्रामपंचायत सदस्य, पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी, पारेषण विभाग, टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱयांनी घटनेची माहिती घेतली.
टाटा पॉवर कंपनीकडे गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा
पनवेलमधील वाढत्या वाहतूक कोंडीचे प्रमाण पाहता करंजाडे मधील नागरिकांना पनवेल येथे जाण्यासाठी करंजाडे-भिंगारी हा रस्त्याचा वापर करीत होते. मात्र या धोकादायक पुलावरून नागरिकांची होणारी संभाव्य जीवित हानी व येथील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता या पुलाची तातडीने लवकरात लवकर दुरुस्ती किंवा नुतनीकरण करण्याकरिता पारेषण विभाग, टाटा पॉवर कंपनीकडे गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.
– रामेश्वर आंग्रे – सरपंच, करंजाडे ग्रामपंचायत
धोकादायक पुलाची दुरुस्ती हि सरकारच्या अधिकार क्षेत्रात
करंजाडे भिंगारी सब स्टेशन मधील पत्री पुलाची अवस्था अतिशय धोकादायक दिसून येत आहे. सर्व सामान्यांच्या सुरक्षितेसाठी हया पुलाचा वापर त्वरित बंद करावा असे आमचे मत आहे. तसेच हा पुल सर्व सामान्य नागरिक वापरत असल्याने त्याची देखभाल व दुरुस्ती हि सरकारच्या अधिकार क्षेत्रात येते व संबंधित संस्थेने हे कार्यकरणे गरजेचे असल्याचे पारेषण विभाग, टाटा पॉवर कंपनीचे प्रमुख किरण विनायक देसले यांनी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी पुलाची दुरुस्ती करण्यासाठी पाठविलेल्या पत्राला उत्तर दिले आहे.