खारघर टाटा रुग्णालयातील प्रतिक्षा यादी संपणार
पनवेल(प्रतिनिधी) कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी आज खारघर येथे पत्रकार परिषदेत मोदी सरकार तसेच विशेषत्वाने केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी व केंद्रीय राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे आभार मानले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले कि, कॅन्सर निष्पन्न झालेल्या अनेक लोकांसाठी टाटा हॉस्पिटल हे परवडणाऱ्या दरात उपचार देणारे मुंबई परिसरातील आधाराचे ठिकाण आहे. मात्र तेथील देशभरातून येणारे रुग्ण आणि त्यांची प्रतीक्षा यादी यामुळे तातडीने उपचाराला विलंब लागत होता आणि त्यामुळे अनेकांचे जीव जात होते. वेळेत उपचार होऊन अनेक रुग्णाचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे अनेक परिवारांना दिलासा मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने हा निर्णय लाखो परिवारांना दिलासा देणारा ठरणार आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.
टाटा हॉस्पिटल मधील मनुष्यबळाची संख्या तब्बल २४०५ तर रुग्ण खाटांची संख्या ९३० करण्यात येणार असून आमदार महेश बालदी यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.
मनुष्यबळाचा विचार केला असता या ठिकाणी सध्यस्थितीत सर्व श्रेणीतील एकूण १०६७ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये आता वैद्यकीय, नर्सिंग, तंत्रज्ञ, सुरक्षा, हाऊसकीपिंग आणि प्रशासकीय अशा सर्व श्रेणींमध्ये भर पडून ती संख्या २४०५ कर्मचाऱ्यांची होणार आहे. त्यामुळे कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी मोठी मदत होणार असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.त्यामुळे हे सर्व परिवार मोदी सरकारला दुवा देणार आहेत, असेही आ.बालदी यांनी अधोरेखित केले.